डॉल्बी, दारु, गुटख्यावर बंदी

नेर्ली ग्रामसभेत निर्णय : सरपंच राजाराम शिंदे यांचा ठराव मंजूर

नेर्ली (ता. कडेगाव) येथील ग्रामसभेत डॉल्बी, दारू, गुटखा वस्तूंवर बंदी घालण्याचा ठराव बहुमताने लोकनियुक्त सरपंच राजाराम शिंदे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आला. ग्रामसभेत हा ऐतिहासिक निर्णय घेणारी ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबरोबरच गावामध्ये व्यायाम शाळा, नाना-नानी पार्क उभारणे, गावात जागोजागी धोबीघाट तयार करणे, नेर्ली गावातील प्राथमिक शाळेला मॉडेल स्कूल बनवणे, स्मशानभूमी सुशोभिकरण करणे, शालेय मुलांचा अभ्यास व्हावा यासाठी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मोबाईल टीव्ही असे करमणुकीची सर्व उपकरणे बंद ठेवणे यासाठी दोन्ही वेळा सायरन वाजवणे, मुलांचे, नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पाणी पिण्यासाठी दिवसात तीन ते चार वेळा सायरण (भोंगा) वाजवून पाणी पिण्याची आठवण करुन देणे, शासकीय इमारतीवर डिजिटल, बॅनर न लावणे अशा प्रकारचे २१ ठराव ग्रामसभेत ६७ वर्षात प्रथमच बहुमताने मंजूर केले. सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी उपस्थित अधिकारी, मान्यवरांचे स्वागत केले. सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागा कडून नागरिकांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. नागरिकांनी विविध शासकीय योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले.

यावेळी सरपंच राजाराम शिंदे सरकार, नेर्ली सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत पाटील, माजी सभापती मंगल क्षीरसागर, ग्रामसेवक सुरेंद्र प्रताप, तंटामुक्ती उपाध्यक्ष सिकंदर मुजावर, उपसरपंच प्रकाश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संजय मोहिते, शंकर मुळीक, अभिजित वलेकर, सदस्या संजीवनी पवार, मुमताज मुजावर, मदिना आगा, सुरेखा लोंढे, गंगुबाई गायकवाड, धनाजी पवार, हिम्मत मुल्ला, सुभाष वलेकर, आनंदा लोंढे, हणमंतराव पवार, माजी उपसरपंच अस्लम मोमीन, सर्व शासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top